बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०२.०१.२०२९
बीड- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ डिसेंबरच्या पहाटे राजेंद्र हिरालाल दागडिया यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून २ लाख २७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेच्या आदल्या दिवशी शिवाजीनगर हद्दीतील शाहूनगर येथील विठ्ठल डावकर यांच्या दारासमोरील स्कुटी व घरातील एलईडी लंपास केली होती. याचा तपास एलसीबीचे पीआय भारत राऊत यांनी लावला असून मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणी नसतांना आरोपी अक्षय उर्फ चिंट्या मिठु गायकवाड (वय ३२) रा.बीड, वशीम खान अफजल खान पठाण (वय ३३) व उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फारूखी यांनी विठ्ठल डावकर रा. शाहूनगर यांच्या घरात प्रवेश करत घरातील एलईडी व दारासमोरील स्कुटी लंपास केली. त्यानंतर याच आरोपींनी पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ डिसेंबर पहाटे राजेंद्र हिरालाल दागडिया यांच्या घरात घुसून घरातील झुंबर, अंगठ्या यासह २ लाख २७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी पेठ बीड व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर याचा तपास एलसीबीचे पीआय भारत राऊत हे करत होते. काल वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर पेठ बीडमधील चोरीचा मालही मिळण्याची शक्यता आहे. आज हे तिन्ही आरोपी शिवाजी नगर पोलीसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी सांगितली. सदरील कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, एलसीबीचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जोंधळे, दराडे, केंद्रे, जगताप, ठोंबरे, साजेद पठाण, वाघमारे, चालक हरके, हराळ यांनी केली.



















