सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०१.२०२०
महाबळेश्वर- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे.या स्मारकाभोवती अनेक अनधिकृत फेरीवाल्यांनी गराडा घातला होता.त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनधारक आपल्या गाड्या स्मारकाला लागून पार्क करत होते.विशेष म्हणजे बाजूलाच लागून नगरपालिकेचे वाहन तळ आहे.याप्रकारामुळे बाबासाहेबांचे स्मारक विद्रुप दिसत होते.या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यासाठी समाजसेवक किरण शिंदे यांनी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या माध्यमातून नगर पालिकेला प्रत्यक्ष भेटून व लेखी पत्र देऊन कळविले पण एकाच पत्रात ऐकेल ती महाबळेश्वर नगरपालिका कसली ? किरण शिंदे यांनी नगरपालिकेने याप्रकरणी दुर्लक्ष केल्यानंतर सदर विषयावर अनेक वेळा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.मुख्याधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेऊन प्रकरणाचे गांभीर्य विषद केले.अनेक लेखी पत्रे देऊन अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेला अखेर जाग आली.व स्मारका भोवतीचे अतिक्रमण नगरपालिकेने हटविले,नो पार्किंगचे बोर्ड लावले,पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहन पार्किंग करणारांवर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली.स्मारकास रंगरंगोटी,तुटलेल्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती केली आहे.त्यामुळे अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाने मोकळा श्वास घेतला अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे.तर किरण शिंदे यांनी या प्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.या अशा शहरातील बाबी नगरपालिकेने लक्षात घेतल्यास शहरास सौंदर्य प्राप्त होईलच शिवाय शहरास स्वच्छ सर्वेक्षणाचे बक्षीस देखील मिळेल पण आवश्यकता आहे ती डोळस दृष्टीची अशी प्रतिक्रिया किरण शिंदे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.



















