सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०१.२०२०
खटाव- तालुक्यातील वडूज पोलीस ठाण्यात ब्रम्हदेव दिनकर पाटोळे रा.मांडवे ता. खटाव, याच्यावर अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडूज पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेंद्र सातपुते रा. वडूज ता. खटाव, यांनी उपचारासाठी म्हणून १०००० रुपयांची मागणी ब्रम्हदेव पाटोळे यांच्याकडे केली होती. ब्रम्हदेव पाटोळे यांनी दरमहा २२% व्याजदराने व्याज कापून घेत ७८०० रुपये सातपुते यांना दिले. एका महिन्यात पैसे परत करता न आल्याने पाटोळे हे सातपुते यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाटी शिवीगाळ करत २६००० रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. सातपुते यांनी दरमहा ठरल्याप्रमाणे व्याज २२०० रुपये पाटोळे यांना दिले. असे ३ महिने सातपुते यांनी पाटोळे याला व्याज दिले, चौथ्या महिन्यात पाटोळे पुन्हा सातपुते यांच्या घरी गेले व ५२००० रुपयाची मागणी केली, पुन्हा दमदाटी शिवीगाळ केली. अखेर सातपुते यांनी घेतलेली १०००० रुपयांची मूळ रक्कम पाटोळे यांना परत केली. मात्र पाटोळे यांनी वारंवार सातपुते यांना भेटेल तिथे त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अखेर सातपुते यांनी काल (शनिवार) वडूज पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, वडूज पोलिसांनी विनापरवाना सावकारी, दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रखरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून स.पो.नि. शिवाजीराव विभूते पुढील तपास करीत आहेत.
अशाचप्रकारे इतर कोणाला सावकाराचा त्रास झाला असेल तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन वडूज पोलिसांनी केले आहे.



















