सातारा (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०६.२०२०
महाबळेश्वर- नाकिंदा क्षेत्र महाबळेश्वर रोड (डचेस रोड वर तांदुळनहीच्या जवळ “डिंगली डेल” या बंगल्याच्या जवळ टाटा ट्रस्ट/टाटा सन्सने नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले असुन ते तात्काळ हटवावे अशी तक्रार बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दि.१२.०६.२०२० रोजी मुख्याधिकारी महाबळेश्वर यांना देण्यात आली होती.तसेच सामाजिक कार्यकर्ते शंकर ढेबे यांनी देखील याच आशयाची तक्रार मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिली होती.अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व वारंवार लेखी तक्रार देऊनही प्रशासनाच्या वतीने कसलीच ठोस कारवाई न झाल्यामुळे सार्वजनिक रोडवर “डिंगली डेल” या खासगी बंगल्याच्या बाजूने धनिक मालकाने तारेचे कुंपण नव्याने उभे केले आहे.जे पुर्वी असलेल्या तार कंपाउंड व वॉल कंपाउंड च्या साधारण ५-७ फुट बाहेर अगदी रोडला लागुण करण्यात आले आहे.
या रस्त्याने महाबळेश्वरच्या पॉईंट दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर वहानांची वर्दळ होत असते. आधीच हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद असुन या रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीस नेहमीच मोठ्या ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो.आणि यातच टाटांनी केलेले हे अतिक्रमण म्हणजे महाबळेश्वरकरांच्या अडचणीत भर घालणारे आहे.तसेच महाबळेश्वरच्या भविष्याच्या दृष्टीने देखील अतिशय अडचणीचे ठरणारे आहे.
टाटांच्या मॅनेजरच्या मते सदर रोड आमच्या हद्दीतून गेलेला आहे.नगरपालिकेने आमचे जुने तार कंपाउंड तोडले आहे.त्यामुळे आम्ही हे नवीन तार कंपाउंड केले आहे.२०१८ साली टाटांच्या वतीने नगरपालिकेस तार कंपाउंड तुटल्याचे पत्र देखील देण्यात आले होते.परंतु नेहमी प्रमाणे नगरपालिकेने या पत्रावर कसलीच कारवाई न केल्याने त्याचे परिणाम मात्र महाबळेश्वरच्या नागरिकांना भोगावे लागणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ही प्रॉपर्टी टाटांच्या ताब्यात असली तरी या प्रॉपर्टीचे मूळ मालक दलाल हे होते.त्यांच्या कारकिर्दीत दलाल यांनीच हा रोड नगरपालिकेस दिल्याचा इतिहास आहे.त्याचवेळी त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीच्या हद्दी या दगडी कुंपण करून, देवनळीचे वृक्ष लावून कायम केल्याच्या खुणा आजपर्यंत अस्तित्वात आहेत व सध्या टाटांनी या हद्दी तोडून बेकायदेशीरपणे मूळ मालकाने सार्वजनिक रस्त्यासाठी सोडलेल्या रोडवर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
महाबळेश्वरचे अस्तित्व या मोठया धनिकांमुळे धोक्यात आल्याचे अनेकदा समोर आले आहे.वाधवान कुटुंबीयांनी लॉक डाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून महाबळेश्वरमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना आता या “डचेस रोडवर” अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.डिंगली डेलच्या मॅनेजरला भेटून अधिक माहिती घेतली असता त्यांनी ही प्रॉपर्टी टाटांच्या मालकीची असल्याची माहिती दिली आहे.तर या प्रॉपर्टीचे नकाशे अथवा मोजणीचे कागदपत्रे दाखविण्याची विनंती केल्यावर ते उपलब्ध नसल्याचे समजते.तसेच या प्रॉपर्टी मध्ये आरसीसी चे काम देखील मोठ्या प्रमाणात चालू असून त्याची देखील कसलीही परवानगी नसल्याची बाब समोर आली आहे.या कंपाउडचे काम चालू असताना वृक्षांची तोड झाल्याची बाब देखील समोर आली आहे.
या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कसलीच कारवाई झाली नसून या पाठीमागे नगरपालिकेची उदासीनता दिसून येत असून याचे कारण अधिकाऱ्यांचे धनिकांशी असलेले लागेबांधे असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.तसेच गरिबांना एक न्याय आणि धनिकांना एक न्याय असे दुहेरी चित्र महाबळेश्वरमध्ये निर्माण झाल्याची चर्चा असून त्याचे कारण भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट लोकप्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे.
सदर अतिक्रमण हटविले न गेल्यास व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली आहे.तर “सेव्ह महाबळेश्वर ” या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील या आंदोलनात सामील होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.



















