अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य, संघटनेचा ओमकार इंग्लिश मिडियम स्कूलला मोठा दणका.
ठाणो(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०८.२०२२
डोंबिवली- आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणुक देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पाठ्यपुस्तके विहीत मुदतीत वितरीत न केल्याबाबतच्या तक्रारी तसेच पाठ्यपुस्तकांसाठी अवास्तव व नियमबाह्य पैशाची मागणी ओमकार इंग्लिश मिडियम शाळा करीत असल्याबाबतच्या असंख्य तक्रारी अनेक पालकांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि स्वाभिमानी शिक्षण संघटनेकडे केल्या होत्या. सदर तक्रारींच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, डॉ. अमित दुखंडे सुनील चव्हाण, मनोज वाघमारे, दिपक मागाडे यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मुजोर प्रशासनाने त्यांची भेट नाकारली तसेच लेखी निवेदनाची पोहच देण्यासही नकार दिला. सदरची व्यथा सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत यांचेकडे मांडली असता सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पिडीत पालकांसह गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कल्याण यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे ठरविले असता त्यांनी ही पालकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना भेट नाकारुन फक्त निवेदन स्विकारले व आम्ही शाळा प्रशासनास नोटीस काढू असे मोघम उत्तर अण्णा पंडीत यांना दिले.
इकडे मुजोर शाळा प्रशासन पालकांना पैसे भरल्याशिवाय शालेय साहित्य व पाठ्यपुस्तके मिळणार नाही. अशी सक्ती करुन पालकांस त्यांनी वेठीस धरले होते.
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत याचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, मनोज वाघमारे, दिपक मागाडे, सुनील चव्हाण अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रशांत जाधव इत्यादी कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचे भेटीसाठी गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु त्यांचे प्रतिनिधी उपशिक्षणाधिकारी ठाणे यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली व शाळा प्रशासनाची लेखी तक्रार करण्यात आली त्याची तात्काळ दखल घेऊन शिक्षण विभाग ठाणे यांनी शाळा प्रशासनास सदरच्या विद्यार्थ्यांना उपरोक्त सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात या बाबतचे आदेश देण्यात आले. या आदेशांची धास्ती घेत ओमकार शाळा प्रशासनाने तात्काळ विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय साहित्य व पाठ्यपुस्तके देण्यास सुरुवात केली आहे. समस्त पिडीत पालकांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे आभार व्यक्त केले आहे.



















