रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अमित साहू दि.१०.१०.२०२२
नवी मुंबई- उरण गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन (जीटीपीएस) या गॅसवर आधारित औष्णिक वीज केंद्रात रविवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
तीन जखमींना सुरुवातीला उरण येथील जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र भाजलेल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात हलविण्यात आले.
कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे, तंत्रज्ञ कुंदन पाटील आणि कामगार विष्णू यशवंत अशी जखमींची नावे आहेत. स्फोटानंतर अग्निशमन आणि बचाव कार्यासाठी GTPS प्लांटमध्ये अनेक फायर इंजिन रवाना करण्यात आले.
बॉयलरच्या वॉटर बूस्टर पंपचा अचानक स्फोट होऊन बॉयलरमधील उच्च तापमानाचे पाणी परिसरात पसरल्याने प्लांटमधील तीन कर्मचारी भाजल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. बॉयलरजवळील तीन कर्मचारी स्फोटाचे बळी ठरले.
नॅशनल बर्न्स हॉस्पिटल, ऐरोलीचे डॉक्टर सुनील केसवानी यांनी सांगितले की, रूग्ण विवेक दुमाले यांना हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले. कुंदन पाटील (४३) हे ८८ टक्के तर विष्णू यशवंत (४३) हे ८५ टक्के भाजले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



















