सांगली-(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०९.२०२०
सांगली- कडेगाव येथे सायंकाळच्या दरम्यान मिळालेल्या गुप्तवार्तेनुसार कडेगाव येथे दि २५.०७.२०२० रोजी संशयित आरोपी श्री. सुनीलदत्त पांडुरंग जाधव, रा. कडेगाव यांनी त्यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरून माकडांना हुसकावून लावण्यासाठी एअरगन ने त्यांच्या दिशेने छरे फायर केले. ज्यात एक माकड जखमी होऊन मृत झाल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कडेगाव येथे मिळाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल ठोंबरे, वनरक्षक अभिजीत कुंभार, वनरक्षक राजेश पाटील व वनरक्षक अनिल कुंभार यांच्या पथकाने कारवाई करून आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेतले. तक्रारीत नमूद असलेल्या मृत माकडाला तेथील रहिवाशींनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी दफन केले होते, तिथे उत्खनन करून माकडाच्या पार्थिवाचे पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक यांचे कडून शव-विच्छेदन करण्यात आले. ज्यात माकडाच्या शरीरावर कोठेही छऱ्याचे निशाण आढळून आले नाहीत. त्यामुळे त्या माकडाचा अपघाती मृत्य झाला असल्याचे यातून निष्पन्न झाले.
परंतु संशयित आरोपी यांनी माकडांना हुसकावून लावणे, त्यांना जखमी करणे, मृत करणे या उद्देशाने एअरगन ने छरे फायर केले असल्या कारणाने वन्यजीव अधिनियम १९७२ मधील कलम २(१६)(अ, ब), ९,३९,५० व ५१ अंतर्गत शिकारीचा प्रयत्न करणे या कारणासाठी त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. तिथे त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर कारवाई ही मा.सहाय्यक वनसंरक्षक, सांगली श्री. गजानन चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यापुढे देखील कडेगाव तसेच पलूस तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणे अथवा शिकरीचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांना अशी शिकारीची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास त्वरित वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या २४२०२० या लँडलाईन क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कडेगाव-पलूस मदन क्षीरसागर यांनी केले आहे.



















