मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०१.२०२०
मुंबई- आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला या वर्षामध्ये अजून झळ बसण्याची शक्यता आहे. कारण येत्या वर्षात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास आता ज्या दरात गॅस सिलिंडर मिळतो त्यापेक्षा ग्राहकांना १०० ते १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
जुलै २०१९ ते जानेवारी २०२० या काळात गॅस सिलिंडरच्या किमतीत सरासरी १० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर सध्या भडकल्याचे दिसत आहेत. आता येत्या काळातही ही वाढ होत राहतील, असे समजते. ग्राहकांना बाजार भावापेक्षा कमी किमतीत सिलिंडर देण्याचे गॅस कंपन्यांवर बंधन आहे. कारण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत किती असावी, यावर सरकारचे नियंत्रण आहे. येत्या काळात हे नियंत्रणच काढण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचा फायदा होणार असला तरी ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे सरकार तेल कंपन्यांना अनुदानापोटी मिळणारी रक्कम थोडी-थोडी कमी करून सरकार गॅस दरावरील नियंत्रण कमी करणार आहे. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या काळात तेल कंपन्यांनी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती ६३ रूपयांनी वाढवल्या आहेत. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला १० रूपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता जर पुढील १५ महिने जर याच १० रूपये दराने भाववाढ होत राहिली तर तेल कंपन्यांना सरकारच्या अनुदानाची गरज लागणार नाही.
सध्या १४.२ किलोच्या एल.पी.जी. सिलिंडरची किंमत ५५७ रुपयांच्या आसपास आहे आणि सरकार तेल कंपन्यांना १५७ रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. कंपन्यांनी दरवाढ सुरू ठेवल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६० डॉलर प्रति बॅरेल राहिल्यास सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम घटवली जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास सिलिंडरचे भाव १०० ते १५० रुपयांनी वाढतील.



















