पुणे(निर्भीड पत्रकार पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०३.२०२१
पुणे- पेट्रोल व डिझेलबरोबरच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही सतत वाढ होत असून, मार्चच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर आणखी २५ रुपयांनी महागला. गेल्या महिन्यात तीनदा मिळून सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. पण सिलिंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढवण्यात आले. एकीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक महागली आहे. परिणामी भाज्या, अन्नधान्ये महाग होत आहेत. त्याचा सामान्यांना फटका बसत आहे. त्यात पुन्हा सिलिंडर महागल्याने गरीब व सामान्यांचे बजेट कोलमडून पडण्याची शक्यता आहे. याआधी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये आणि २५ फेब्रुवारीला २५ रुपये अशी दरवाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीत १०० रुपये व आज २५ रुपये असे १२५ रुपयांनी सिलिंडर महागले आहे. केंद्र सरकार सबसिडी सतत कमी करीत असून, त्यामुळेच गॅस सिलिंडर महाग होत आहेत. लोकांना ते घेणे परवडेनासे झाले आहेत आणि त्यांची मागणीही घटली आहे. अनेक जणांनी गॅस सिलिंडर घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागांतील गरीब तर पुन्हा चुलीचा वापर करू लागले आहेत. या दरवाढीमुळे मुंबई व दिल्लीत गॅस सिलिंडरसाठी ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात सिलिंडरची किंमत ८४५, चेन्नईमध्ये ८३५, तर हैदराबादमध्ये ८७१. ५० रुपये इतकी असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची माध्यमात चर्चा आहे. असा निर्णय होण्याआधीच मोर्चा काढून श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सायकल रॅली काढल्याची शंका आहे. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते



















