डी.आर.डी.ओ.चं ‘अँटी कोविड २-डी.जी.’ औषध आलं;
संरक्षण मंत्र्याच्या हस्ते अनावरण
मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०५.२०२१
मुंबई- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डी.आर.डी.ओ.) विकसित केलेल्या अँटी-कोविड औषध २-डी.जी.चे पहिल्या बॅचचे अनावरण केलं.
त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे या औषधाचा साठा सुपूर्द केला. “आम्ही निश्चिंत राहणार नाही आणि खचून देखील जाणार नाही कोविडविरुद्ध लढाई लढत राहू आणि ती जिंकू.
पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑक्सिजन उत्पादनाचा प्रश्न सुटला आहे. आता औषधाचा प्रश्नही तितकासा नाही,”
असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डी.आर.डी.ओ.) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डी.सी.जी.आय.) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. ते तोंडावाटे घेता येणार आहे. २ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डी.जी.) हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते. २-डी.जी. हे औषध डी.आर.डी.ओ.तील प्रयोगशाळा असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (इन्मास)ने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने विकसित केले आहे.



















