सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०५.२०२०
पाटण- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदेही बंद आहेत यामुळे हातावर पोट असणा-या लोकांचे हाल होऊ नये यासाठी पाटण तालुक्यातील मुळगांव गावचे सुपुत्र श्री.तुकाराम आनंदा मोळावडे (तुकाभाई) यांनी जीवनावश्यक वस्तू व मास्कचे गावात वाटप केले आहे.
तुकाराम मोळावडे हे सध्या नोकरीसाठी दुबईमध्ये वास्तव्यास असून लॉकडाऊनमुळे ते गावी येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी त्यांच्या गावातील संतोष पांडुरंग मोळावडे व सुनिल शेजवळ या दोन मित्रांकडे गावातील गोरगरिबांच्या मदतीसाठी रक्कम पाठवून मित्रांच्या सहाय्याने मुळगांवमध्ये जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप केलेले आहे. कोरोना विषाणूचा सामना संपूर्ण देश करत आहे. या विषाणूचा प्रभाव ग्रामीण भागातील जनतेवर पडताना दिसत आहे म्हणूनच या पार्श्वभूमीवर श्री.मोळावडे यांनी मुळगांवमध्ये गरजूंना अत्यावश्यक वस्तू वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.
तुकाराम मोळावडे नेहमी ग्रामस्थांच्या संकटकालीन परिस्थितीतही मदत करतात तसेच गावातील सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीतही ते वेळोवेळी हातभार लावतात. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पाटण तालुक्यातील सर्व नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.



















