मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१७.०९.२०२२
मुंबई – शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं.” तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे देखील स्पष्ट केले आहे परंतु मुंबई महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही याबाबत संभ्रम असताना आज उद्धव ठाकरे यांनी बैठकीत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे.” तसेच शिवसेनेचा २१ तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.



















