सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०८.२०२२
पाटण : सन २०२२-२३ या वर्षासाठी पाटण तालुका मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी संजय घाडगे यांची तर उपाध्यक्षपदी जनार्दन पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी प्रा.श्रीगणेश गायकवाड, सचिवपदी दिनकर घाडगे, सहसचिवपदी मधुकर आरेकर तर तालुका संपर्क प्रमुख पदी प्रशांत देवके , संघटक पदी बाळासो मोहिते तर सह संघटक पदी श्री.ताटे यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष भारत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. पाटण तालुका मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या निवडीची बैठक पाटण याठिकाणी येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष भारत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानवाधिकार संघटनेची नूतन कार्यकारिणी निवड बिनविरोध पार पडली. निवडीनंतर बोलताना सातारा जिल्हाध्यक्ष भारत पाटील म्हणाले की, कोरोना काळातील निर्बंधामुळे थोडासा विस्कळीतपणा आला होता. नवीन कार्यकारीणी जोमाने काम करेल .अन्यायाविरुद्ध न्यायिक मार्गाने लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार संघटना सदैव तत्पर राहील . संजय घाडगे म्हणाले की, मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून माझ्यावर जो विश्वास दाखविला तो विश्वास मी सार्थ ठरवेन. या निवडीमुळे माझ्यावरील जबाबदारी निश्चितच वाढली आहे. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वाना सोबत घेवून एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. श्रीगणेश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मागील बैठकीबाबत उहापोह केला तर तालुका संपर्क प्रमुख प्रशांत देवके यांनी सर्वांचे आभार मानले. सदर बैठकीस पाटण तालुका मानवाधिकार संघटनेचे सर्व माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.