सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
दि.०३.११.२०२०
फलटण- तालुक्यातील नांदल येथील प्रसाद स्टोन क्रशरने विनापरवाना केलेल्या सुरुंग स्फोटामुळे नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ नुकसान भरपाई प्रसाद स्टोन क्रशरच्या मालकाकडून वसुल करून द्यावी तर बेजाबदार प्रसाद स्टोन क्रशरचा मालक व त्यास पाठीशी घालणारे कर्मचारी यांचेवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी फलटण तालुका शिवसेनेचे प्रमुख प्रदीप हरिभाऊ झणझणे यांनी एका निवेदनाद्वारे फलटणचे तहसीलदार समीर यादव यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आल्या आहेत.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, नांदल तालुका फलटण हद्दीतील नियमबाह्य खाणकाम व्यवसाय करणारा प्रसाद स्टोन क्रशरचा मालक व त्यास पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून नुकसान ग्रस्ताना प्रसाद स्टोन क्रशरच्या मालकाकडून तात्काळ नुकसान भरपाई करण्यात यावी.
२८ ऑक्टोबर २०२० रोजी नांदल हद्दीतील खाणीत लावलेला मोठ्या तीव्रतेच्या सुरुंगाच्या स्फोटात परिसरातील आसपासच्या गावातील घरांना हादरा बसून मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. वास्तविक पाहता या क्रशर खान पट्टीची मुदत २९ जून २०२० रोजी संपलेली असताना फलटण महसूल विभागाने यावर अगोदरच कारवाई का केली नाही? असा सवाल या निवेदनामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. सदर खाण पट्टीही फलटण सातारा जिल्हा मार्गालगत आहे नियमानुसार जिल्हा मार्गालगत खाणीस परवानगी देता येत नाही म्हणजे पाच वर्ष नियमबाह्य सदर खाणकाम सुरू असल्याचा गौप्यस्फोट यावेळी प्रदीप झणझणे यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून प्रसाद स्टोन क्रशरचा मालक व त्याला पाठीशी घालणारे अधिकारी या दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. तर सुरुंग स्फोटाच्या हादऱ्यामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून दोषी स्टोन क्रशरच्या मालका कडून नुकसानग्रस्तांना जलद गतीने मदत करण्यात यावी अन्यथा शिवसेना शिवसैनिक तीव्र आंदोलन हाती घेईल व त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा होणाऱ्या दुरवस्थेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल याची गंभीर दखल घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.



















