सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०२.२०२०
सातारा- बाजार समित्यांमधे कुठल्या शेतमालाला किती भाव आहे याची माहिती आज शेतकऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळत आहे. याचा विचार करुन शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पिक घेतल्यास त्यांची आर्थिक उन्नती निश्चित होईल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाई विभागीय कार्यालयाचे नूतन इमारतीचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
याप्रसंगी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रींमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नितीन पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशाला व राज्याला दिशा देणारी बँक आहे. या बँकेची वसुली ९५ टक्के असून अनेक पुरस्कार या बँकेने मिळविले आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऊस पिक घ्यायचे असेल ते ठिबक सिंचनाखाली घ्यावे. यामुळे पिकाला पाणी कमी लागते, जमिनीचा पोतही कायम राहतो व उत्पदनातही वाढ होते, ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करावा, अशी माझी आग्रहाची भूमिका असल्याचेही विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी सागितले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आर्दश बँक असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका नेहमी घेतली आहे. बँकेच्या उपविभागीय कार्यालय इथल्या नागरिकांच्या जीवनात परिर्वतनाचे काम करेल. महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच राज्य शासन नियमित कर्ज भरत असणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करीत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
वाई शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ही बँकेची वास्तु आहे. ही वास्तू सर्वसुविधांयुक्त असून अभिमान वाटावा अशी आहे. बँक दरवर्षी अ वर्गात राहिली आहे. या बँकेला ८० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. या बँकेने नेहमीच सभासदांचे हित जपले असून कर्ज देणे व घेणे हा उद्देश डोळयासमोर न ठेवता माणसांना उभे करण्याचे कामही या बँकेने केले आहे. या बँकेचा आर्दश घेतला तर सहकार चळवळ आणखीन भक्कम होईल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँकेने ३४ टक्के स्वनिधी वाढविला आहे. बँकेने सकारात्मक निर्णय घेऊन वेगवेगळया योजनांतर्गत मोठया प्रमाणात कर्ज वितरीत केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात अग्रेसर बँक असून ८७ टक्के ढोबळ नफा झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ विविध कार्यकारी सोसायट्या नफ्यात आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या या बँकेच्या प्रगतीसाठी यापुढेही चांगले काम करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगतिले.
वाई येथे उपविभागीय कार्यालय आज उद्घाटन होत असून हा मोठा आनंदाचा क्षण आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे. या बँकेने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. महिला बचत गटांना ४ टक्के दराने वित्त पुरवठा करणारी राज्यातील पहिली बँक असल्याचेही आमदार मकरंद पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.



















