सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०७.२०२२
महाबळेश्वर- महाबळेश्वरच्या एकाही पॉइंटचे नाव बदलू देणार नाही अशी गर्जना किरण गोरखनाथ शिंदे यांनी केली आहे.दोन दिवसांपूर्वी काही व्यक्तिंनी तहसीलदार महाबळेश्वर यांची भेट घेऊन महाबळेश्वर येथे असणाऱ्या पॉइंटला ब्रिटिश नावे असून ती बदलण्याची मागणी केली. त्याला प्रतिक्रिया देताना किरण शिंदे यांनी महाबळेश्वर हे ब्रिटिश कालीन जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या निर्मिती,जडणघडण यामध्ये ज्या ज्या व्यक्तींचे योगदान आहे अशा महान ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची नावे येथील काही पॉईंटना देण्यात आली आहेत. त्या प्रत्येक नावामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्या नावानेच ती जगभर प्रसिद्ध पावली आहेत. महाबळेश्वरची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता येथील अनेक ठिकाणांना हेरिटेज दर्जा देऊन त्याचे जतन करण्यात आले आहे. इतकेच काय तर ब्रिटिश प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन मालकम यांचे नावे शहराचे मुख्य पेठेचे नाव दिले असून ते आजही अस्तित्वात आहे. महाबळेश्वर येथील जनता त्यांचेवर इतके प्रेम करते की आषाढ महिन्यात त्यांचे नावे जत्रा बनवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. येथील असणाऱ्या पॉइंटची नावे व त्याचा इतिहास सरकारी दफ्तरी नोंद आहे. काही विघ्नसंतोषि प्रवृत्ती महाबळेश्वरच्या जगप्रसिद्ध असणाऱ्या पॉइंटची नावे बदलण्याची मागणी करून महाबळेश्वर येथील वातावरण बिघडवून येथील सामाजिक स्वास्थ बिघडवत आहेत.येथील वातावरण बिघडवून महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय संपविण्याचा त्यांचा कट आहे. महाबळेश्वर येथील नागरिक हे पुर्णतः पर्यटन व्यवसायावरच अवलंबून असून याच पॉईंटचा इतिहास सांगून अनेक तरुण त्यांचा संसार चालवितात. महाबळेश्वर आजही अनेक समस्यांचा सामना करीत असून त्या सोडविण्यासाठी शासनाने अग्रक्रमाने प्रयत्न करावेत. शासनाकडून महाबळेश्वरच्या विकासासाठी भरघोस निधी आणावा व अजून नवीन पॉईन्टची निर्मिती करून त्यास हवे ते नाव द्यावे त्यास आमचा कोणताही आक्षेप नसेल तरी अशा नाव बदलण्याच्या कोणत्याही मागणीचा विचार नकरता केवळ स्थानिक नागरिकांचा व त्यांच्या व्यवसायाचा विचार करून येथील कोणत्याही पॉइंटचे नाव बदलू नये. त्यास आमचा महाबळेश्वर वासीयांचा तीव्र विरोध आहे. अशा आशयाची मागणी करणारे लेखी पत्र किरण गोरखनाथ शिंदे यांनी तहसिलदार महाबळेश्वर यांना दिले असून बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच महाबळेश्वर बचाव आघाडी या प्रस्तावाला विरोध करीत असल्याची गर्जना केली आहे.



















