सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०१.२०२०
सोलापूर- अगोदर महादेव कोळी नंतर मराठा कुणबी आणि बेडा जंगम जातीच्या दाखल्यांनी सोलापूरच्या समाजकारणात आणि राजकारणात धुमाकूळ घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे एक व माला जंगम या जातीचा एक असे जंगम जातीचे दोन दाखले रद्द झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या दाखल्याकडे.
खासदारांच्या दाखल्यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंदकुरे यांनी हरकत घेतली आहे. या हरकतींवर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या आहेत. उद्या (शनिवार, ता. १) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथील तत्कालीन सरपंच विश्वहनाथ हिरेमठ यांच्याकडे असलेले बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र या पूर्वी रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महापालिकेच्या परिवहन खात्यातील निवृत्त समयलेखक विश्वानाथ स्वामी यांचा माला जंगम जातीचा (अनुसूचित जाती) दावा अमान्य केला आहे.
जंगम समाज इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याचा निष्कर्ष जात प्रमाणपत्र पडताळणीच्या दक्षता पथकाने काढला आहे. विश्वसनाथ स्वामी यांच्या विरोधात परिवहन मधील निवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे डिसेंबर २०१४ मधे तक्रार केली होती. उद्या (शनिवारी) खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वधर सूळ, सचिव संतोष जाधव व सदस्या छाया गाडेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.



















