सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.१२.२०१२
महाबळेश्वर- शहर हद्दीतील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाबळेश्वर बचाव आघाडीच्या वतीने महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांनी केले. महाबळेश्वरचे रस्ते डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत असून त्यासाठी बातमी प्रसिद्ध करणे, लेखी व तोंडी निवेदन देणे या सारख्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत होतो. परंतु नागरपालिकेतील भ्रष्ट, भोंगळ कारभार यामुळे प्रश्नांकडे सत्ताधारी व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते.त्यामुळे आमच्या मागण्या मान्य व्हाव्या या साठी आम्ही हे आंदोलन केल्याचे किरण शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आंदोलन चालु असताना मुख्याधिकारी यांनी आम्हांस चर्चेस आमंत्रित केले व आमच्या मागण्या मान्य केल्याचे पत्र आम्हांस मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिले. त्या पत्रामध्ये येत्या १५ दिवसात शहरातील रस्ते डांबरीकरण व दुरुस्त करण्यात येतील असे लेखी आश्वासन देणेत आले आहे.
सदर आंदोलनात शहरातील स्त्री पुरुष नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.हा सर्व शहरवासीयांचा विजय असल्याचे किरण शिंदे यांनी म्हटले आहे. तर शहरातील रस्ते गेल्या पाच वर्षात उखडलेल्या अवस्थेत असून या आंदोलनाने शहरातील पर्यटकांना व नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ घेता येईल तसेच पथदिवे, सुलभ शौचालय, व अन्य मागण्या मान्य झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व घटकातून समाधान व्यक्त केले जात आहे.



















