पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०५.२०२१
पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या अडचणी लक्षात घेण्याबरोबरच अवाजवी भाडे आकारणी टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेपत्रक जाहीर केले आहे. पूर्वीच्या भाडेपत्रकाच्या तुलनेत सुधारित भाडेपत्रकात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे नवे भाडेपत्रक पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लागू राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने भाडेआकारणी होत असल्याच्या अनेक तक्रारी करोनाच्या काळातही करण्यात आल्या आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेपत्रक लागू करण्यात आले होते. त्यानंतरही काही प्रकरणात अधिक भाडेअकारणी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने तातडीने बैठक घेऊन नागरिक आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांचाही विचार करून पूर्वीच्या भाडेपत्रकात काही प्रमाणात वाढ करून सुधारित भाडेपत्रक लागू केले आहे. सर्व रुग्णवाहिकांमध्ये वातानुकूलित यंत्रणा असल्याचे गृहीत धरून हे भाडेपत्रक लागू करण्यात आले असून, रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार वेगवेगळे भाडे ठरविण्यात आले आहे. २५ किलोमीटर किंवा दोन तासांकरिता रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार ५०० ते ९०० रुपये असलेले भाडे ६०० ते ९५० रुपये करण्यात आले आहे.



















