सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०७.२०२०
कडेगाव- तालुक्यातील मौजे शिवणी या गावातील तरुण श्री.मारुती खराडे यांनी दिनांक ११ जुलै रोजी धामण जातीच्या एका सापाला काठीने मारल्या प्रकरणी कडेगाव वन विभाग यांनी कारवाई केली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, ११ जुलै रोजी आपल्या माळ्यातील शेड जवळ धामण जातीच्या एका सापाला काठीने मारून त्याच्या बरोबर काढलेला फोटो फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या बाबत सांगलीतील पिपल फॉर अनिमल्सचे ऍड. बसवराज होसगौडर यांना माहिती मिळाली. सापाला मारलेल्या व्यक्तीचा आपल्या सूत्रांच्या मदतीने शोध घेऊन वन विभागालालेखी तक्रार केली. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने आज सकाळी शिवणी गावातून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मदन क्षीरसागर, वनपाल श्री राजेश पाटील, वनरक्षक श्री अनिल कुंभार यांच्या कडेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने आरोपी मारुती खराडे यांना आज चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी करून आरोपीला कडेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर करण्यात आले. सदर कारवाई ही सहाय्यक वनसंरक्षक सांगली श्री. गजानन चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कार्यालय कडेगाव पलूस मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पार पडली. तरी नागपंचमी उत्सवा निमित्ताने आपल्या कडेगाव व पलूस भागामध्ये जर कुणी अघोरी प्रथा पाळण्यासाठी सापांना पकडण्याचे गैरकृत्य करताना आढळल्यास नागरिकांनी १९२६ या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे कडेगाव व पलूस तालुक्यातील नागरिकांना वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले.



















