सेक्टर २०, कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि.२१.०७.२०२६
मुंबई – नवी मुंबईतील सेक्टर 20, कोपरखैरणे येथील सार्वजनिक गार्डनमध्ये काल दुपारी एक मोठे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
हे गार्डन परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून येथे दररोज सकाळी व संध्याकाळी अनेक नागरिक वॉकिंगसाठी येतात. तसेच ज्येष्ठ नागरिक येथे बसून वेळ घालवतात आणि लहान मुले खेळण्यासाठी या गार्डनचा वापर करतात.
घटना घडून एक दिवस उलटूनही संबंधित प्रशासनाकडून झाड हटविण्यासाठी किंवा पाहणी करण्यासाठी अद्याप कोणतेही पथक आले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. परिसरात अजूनही अनेक मोठी झाडे असल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



















