सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या संशयित बँक खात्याप्रकरणी गुन्हा दाखल
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि. ३० जुलै २०२६
संग्रामपूर- सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या बँक खात्याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, संग्रामपूर शाखेतील एका खातेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबर २०२५ रोजी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनेत तक्रारदाराची ₹५०,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात संबंधित व्यवहारासाठी वापरण्यात आलेले बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र, संग्रामपूर शाखेतील असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी तक्रारीच्या आधारे तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी NCCRP पोर्टलवरील तक्रार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित खातेदाराविरुद्ध कारवाई सुरू केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करत आहेत.
यापूर्वीही सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याच्या संशयावरून अशाच प्रकारच्या बँक खात्यांबाबत गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्वतःचे बँक खाते वापरासाठी देऊ नये तसेच संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



















