ठाण्यात खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन; महापालिकेला इशारा
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि. ५.०८.२०२६
ठाणे – पावसाळा सुरू होताच ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आंदोलन छेडले.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून महापालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
खड्डे बुजवण्याऐवजी झाडेच लावावी लागतील का?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. शहरातील धोकादायक खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



















