नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे
दि.४.१०.१९
दिंडोरी- तालुक्यातील लखमापूर येथील रूपालो समाधान सोनवणे (वय -३५ वर्ष) या बहिणीने आपल्या भावाला स्वतःची किडनी दान केल्याने परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , विकी राजेंद्र गांगुर्डे हा २४ वर्षांचा तरुण पिंपळगाव (बसवंत) येथे राहत असून तो गरीब कुटुंबातील आहे.परंतु तो नेहमी आजारी राहत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात नेले व तपासणी करून डॉक्टरांनी त्यांची किडनी कृचकामी(फेल) असल्याचे सांगितले.यावेळी त्याला किडनी बसवल्याशिवाय पर्याय नाही या विचाराने त्यांच्या कुटुंबियांनी हालचाली सुरू केल्या.किडनी बसवण्यासाठी दवाखान्यांमधे चौकशी केल्यावर त्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबीयांचा धीर खचला.परंतु तरी देखील त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न चालूच ठेवले एवढी मोठी रकम कोठून आणणार या विचाराने त्यांची बहीण रुपाली समाधान सोनवणे (लखमापूर ता.दिंडोरी) हिच्यासह घरातील सर्व कुटंबीयांनी व नातलगांनी देखील किडनी देण्याचा विचार केला.परंतु सर्व कुटुंबीयांची शारीरिक तपासणी केली असता फक्त बहीण रूपाली इचा रक्तगट व इतर बाबी योग्य वाटत असल्याचे डॉक्टरांनी सांगताच रूपाली हिने लगेचच सासरकडील घरच्यांचा सर्वांचा विचार घेऊन किडनी देण्यास तयार झाली.थोड्या दिवसात तिने आपली किडनी भावाला उदारमनाने व स्वतःचा काहीही विचार न करता दान केली. डॉक्टरांचे प्रयत्नदेखील यशस्वी झाले व भावाला जीवदान दिले व तो भाऊ आज सुखात जीवन जगत आहे.तिच्या या धाडसाने तिचे माहेर कडील व सासरकडील सर्वांनी तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे.या धाडसाची दखल घेऊन लखमापूर येथील विद्यमान सरपंचा मंगल सोनवणे व माजी सरपंचा वर्षा सोनवणे यांनी नुकताच एका कार्यक्रमात रूपाली सोनवणे यांचा सत्कार देखील केला.



















