सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.७.११.१९
फलटण : सुरवडी, ता. फलटण येथे मिठाईचे दुकान चालविणार्या एका व्यावसायिकाचे डेक्कन चौक फलटण येथे दुचाकीच्या डिकीतून सुमारे एक लाख ७ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या लांबवल्यामुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. ४ रोजी गोपाल रामदिन वर्मा (वय २०) रा. मूळ अंम्बाह ओरसा, मध्य प्रदेश सध्या रा. सुरवडी, ता. फलटण यांचे सुरवडी येथे मिठाईचे दुकान आहे. मूळगावी घराच्या कामासाठी आई-वडिलांना सुमारे एक लाख सात हजार रुपये पाठविण्यासाठी फलटण येथील आयडीबीआय बॅकेमध्ये गोपाल वर्मा त्यांची दुचाकी वरुन गेले असता दुपारच्या जेवणाची सुट्टी झाल्यामुळे बँक कर्मचार्यांनी त्यांना काही वेळानंतर येण्यास सांगितले त्यामुळे ते डेक्कन चौक फलटण येथील वडापावच्या दुकानात वडापाव खाण्यासाठी गेले. वडापाव खावून झाल्यानंतर ते त्यांच्या दुचाकी क्र. एम एच ११- एयु- २६७ च्या जवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवलेली एक लाख सात हजार रुपयांची रोकड तपासली असता त्यांना तेथे रोकड आढळून आली नाही. यानंतर त्यांनी वडापावच्या दुकानचालकाला माझी पैशाची पिशवी तुमच्याकडे राहिली आहे काय? अशी विचारणा केली. मात्र वडापाव दुकान चालकाने आपली कोणतीही पिशवी आमच्याकडे राहिलेली नाही, असे सांगितल्यामुळे आपल्या पैशावर कोणीतरी अज्ञाताने डल्ला मारला आहे, याची खात्री झाल्यानंतर दि.५ रोजी यासंदर्भात गोपाल वर्मा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. फलटण शहरातून एवढी मोठी रक्कम चोरीस गेल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. काही दिवसांपासून शांत असलेले फलटण शहर या घटनेमुळे हादरुन गेले आहे. याबाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.
• घटना ४ ची, तक्रार ५ ला…
मिठाई व्यावसायिक गोपाल वर्मा हे बँकेत एक लाख सात हजार रुपये भरण्यास गेले असता वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तसेच एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणे दुचाकीच्या डिकीत ठेवून वडापाव खाल्ला. परंतू दहा रुपयांच्या वडापावापोटी त्यांना दहा लाख रुपये गमवावे लागले. वास्तविक ही घटना ४ रोजी घडली. परंतू याची तक्रार सुमारे एक दिवसानंतर म्हणजेच ५ नोव्हेंबरला करण्यात आल्यामुळे संशयाला वाव मिळत आहे. नक्की पोलीस, तक्रारदार, की चोर चुकले? याबाबतची जोरदार चर्चा फलटण शहरात आहे.



















