नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,राहूल जाधव दि.२०.११.१९
नाशिक- येवला येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे साहेब हे नाशिक जिल्हा पालक न्यायाधीश असल्याने त्यांनी आदेश हा आदेश निर्गमित केला आहे.
येवला येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व्हावे यासाठी येवला बार असोसिएशन आणि येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून ची मागणी होती. यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
येवला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांनाच निर्माण करून ठेवल्या आहेत. येथील ब्रिटिशकालीन न्यायालयाच्या दगडी वास्तूला हानी न पोहोचवता जुन्या कोर्ट इमारतीचे त्यांनी नूतनीकरण आणि विस्तारीकरण केले आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतीशी सुसंगत आणि पर्यावरणाशी समतोल साधणारी नवीन न्यायालय इमारत त्यांनी बांधली आहे.
आता येवल्यात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झाल्याने नाशिक व निफाड येथील जिल्हा न्यायालयांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. या न्यायालयात येवला, नांदगाव आणि मनमाड येथील न्यायालयांचे कामकाज चालेल. त्यामुळे येथे जलद गतीने कामकाज होऊन न्यायालयीन प्रक्रिया अधिक जलद होणार असल्याने नागरिकांना लाभ होणार आहे.



















