पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.११.१९
पिपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अनेक समस्या आहेत या बाबत अनेक निवेदने व अर्ज विनंत्या सादर केलेल्या आहेत. २०१८ मधे उपोषण देखील करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालिका प्रशासना कडून देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. उर्दू प्राथमिक शाळा बाबत म.न.पा. प्रशासनाने नेहमीच भेदभावाचे, दुटप्पीपणा चे व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. प्रशासना मधील कर्मचारी व अधिकारी उघडपणे भेदभाव करतात त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, उलट त्यांना वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून अभय व प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे समाजामध्ये असंतोषाची भावना पसरली असून संपूर्ण समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
🔵 प्राथमिक विभाग
🔹पिंपरी-चिंचवड मनपाच्या एकूण १४ उर्दू प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, व उपशिक्षक यांची तब्बल ४५ पदे रिक्त आहेत, त्या करिता बिंदु नामावली तयार नसल्याचे कारण पुढे केले जाते. मराठी माध्यमाच्या ११०० शिक्षकांची बिंदु नामावली त्वरित तयार करून मंजुरी घेतली जाते व उर्दू माध्यमांच्या फक्त ८८ शिक्षकांची बिंदुनामावली तयार करून त्यास मान्यता घेण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. तरी यास जबाबदार असणाऱ्या लिपिक व प्रशासन अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. बिंदुनामावली तयार करून त्यास मान्यता घेण्यात यावी.
🔹 मुख्याध्यापकांची रिक्त पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत तसेच पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत.
🔹 पूर्वीपासूनच रिक्त असलेल्या व मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या पदांचा आढावा घेऊन प्राथमिक शिक्षकांची पदे त्वरित प्रभावाने भरण्यात यावीत.
🔹 सर्वच उर्दू प्राथमिक शाळांना पुरेशा वर्गखोल्या, खेळाचे मैदान, व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
🔹 सर्वच उर्दू प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, व संगणक शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत.
🔵 माध्यमिक विभाग
🔹 उर्दू माध्यमांच्या आकुर्डी माध्यमिक शाळेमध्ये रिक्त असलेले मुख्याध्यापकाचे पद पदोन्नतीने त्वरित प्रभावाने भरण्यात यावे.
🔹 उर्दू माध्यमाच्या आकुर्डी माध्यमिक शाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित प्रभावाने भरण्यात यावीत.
🔹 उर्दू माध्यमाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुपी नगर, थेरगाव, खराळवाडी, लांडेवाडी, नेहरूनगर व दापोडी येथील ९ वी व १० वी च्या वर्गांना प्रथम मान्यता व स्वतंत्र युडायस क्रमांक मिळणे करिता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात यावेत.
🔹 वरील सर्व शाळांकरिता नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत.
🔹 वरील सर्व शाळांमधील विद्यार्थ्याकरिता बेंचेस, शिक्षकांकरिता स्टाफरुम, टेबल-खुर्च्या, कपाट व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
🔹 उर्दू माध्यमाच्या आकुर्डी येथील कायम शिक्षकांची प्रत्येकी १ याप्रमाणे ६ शाळांवर नियुक्ती करण्यात यावी व तात्पुरत्या स्वरूपात भरलेले ६ शिक्षक आकुर्डी येथे नियुक्त करण्यात यावेत.
🔹 कासारवाडी येथील उर्दू प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता ८ वी च्या वर्गात या शैक्षणिक वर्षात ३५ विद्यार्थी शिकत आहेत त्यांना पुढील शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. मागील २-३ वर्षात सुमारे १५० विद्यार्थी इयत्ता ८ वी नंतर शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत तरी कासारवाडी येथे इयत्ता ९ वी व १० वी चे वर्ग सुरू करण्यात यावेत.
वरील सर्व समस्याबाबत समाजातील अनेक व्यक्तींनी, संघटना यांनी माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी श्री. पराग मुंडे यांना अनेक वेळा तोंडी विनंती केली, लेखी निवेदन दिले परंतु श्री. मुंडे यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तसेच भेटावयास गेलेल्या व्यक्तींना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व महिला पालकांना अरेरावीची भाषा वापरली. तसेच सदर शाळांना प्रथम मान्यता मिळवणे करिता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, उलट शाळा बंद करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे माध्यमिक विभागाच्या बहुतेक समस्यांना श्री. पराग मुंडे हेच जबाबदार असलेने अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, व त्यांच्याकडे असलेला शिक्षणाधिकारी हा पदभार त्वरित काढून घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवावे अशी विनंती पिपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद कडून महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.



















