पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
पुणे- मल्लवीरांसाठी मानाच्या असणार्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदा ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील बालेवाडीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आजपासून ७ जानेवारी पर्यंत चालणार्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची खेळाडूंसोबतच त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता असते.
मामासाहेब मोहोळ यांच्याकडून १९६१ पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे १९८२ साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली ३६ वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि २ लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.



















