महाबळेश्वर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) पार, दि.२१.१०.१८ येथील युवक अनिल कोंडीबा मोरे यांचे दि.१३.१०.१८ रोजी मुंबई येथे आकस्मित निधन झाले.त्यांचेवर अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचा पुण्यानुमोदन,शोकसभेचा कार्यक्रम त्यांचे गावी पार येथे करण्याचे मोरे कुटुंबियांनी निर्णय घेतला.परंतु बौद्ध समाजातील स्वतःला पुढारी म्हणवणारे व अद्याप जात पंचायतीला कवटाळून बसणारे काही समाज कंटक रामचंद्र कदम,अशोक भालेराव,दिलीप यादव,विठ्ठल यादव,लक्ष्मण भागू मोरे,नितीन जाधव,निलेश मोरे यांनी त्या कार्यक्रमावर सामाजिक बहिष्कार घातला व समाजातील धार्मिक विधी घेणारे तसेच समाज बांधव यांना या कार्यात सहभागी होऊ नये म्हणून दबाव आणला.त्यामुळे या विधीला तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील बौद्धचार्य उपस्थित राहिले नाहीत.यामुळे मोरे कुटुंबिया समोर मोठा प्रश्न उपस्थित झाला अखेर मुंबई येथून शंकर गायकवाड यांना या कार्यक्रमाचा विधी पार पाडण्यासाठी पाचारण करण्यात आले.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या राज्यस्तरीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते या कार्यक्रमासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित राहिले व किरण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनिल मोरे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे प्रशांत मोरे,सुमित कांबळे,अनिकेत मोरे,अजय कांबळे,पंकज कांबळे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळुन ७०वर्षे उलटून गेली तरी महाबळेश्वर तालुक्यात जातपंचायतीचे भयाण वास्तव दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत असून ही चिंतेची तसेच तालुक्याच्या दृष्टीने शरमेची बाब आहे असे किरण शिंदे यांनी यावेळी नमूद केले.तसेच अनिल मोरे यांचे कुटुंबियांना घेऊन किरण शिंदे यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाळे साहेब यांची तात्काळ भेट घेतली यावेळी अनिल मोरे यांच्या नातेवाईकांनी आपला तक्रार अर्ज नाळे साहेब यांचेकडे दिला असून नाळे साहेब यांनी मी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करीन असे उपस्थितांना सांगितले आहे.
घडलेला प्रकार हा अतिशय चिंताजनक,किळसवाणा व दुर्दैवी असून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा किरण शिंदे यांनी यावेळी दिला आहे.सर्व स्तरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



















