जामखेड, प्रतिनिधी
अ.नगर केडगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे अ.नगर जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. ह्या हत्याकांडामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. योगेश व राकेश हे दोघे एका दुकानासमोर बसलेले असताना मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर लागोपाठ आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. स्थानिकांनी जखमी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे उपचाराअभावी अर्धा तास तसेच पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेतला. या हत्याकांडा मागे कोण आहे व याचे नेमके कारण काय आहे याबाबत कळू शकलेले नाही. या पूर्वी देखील १ फेब्रुवारीला जामखेड शहरातील नगर रोड वर गोळीबार झाला होता. या घटनेत देखील दोघे जन गंभीर जखमी झाले होते. तिन महिन्यातील ही दुसरी घटना असुन शहरात भितीचे वातावरण आहे.



















