बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०९.१९
बीड- आष्टी, शिरुर, पाटोदा – आष्टी मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान आ.भीमराव धोंडे आणि बीड-उस्मनाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आ.सुरेश धस यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरु आहे. आ.सुरेश धस ऐनवेळी काहीही खेळी करु शकतात, त्यामुळे आ.धोंडे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.
आ.सुरेश धस आणि अक्षय मुंदडा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. धसांच्या मार्गदर्शनाखालीच केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यापुर्वी धसांनी बीड-लातूर-उस्मनाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात थेट राष्ट्रवादीचा उमेदवारच फोडून भाजपात आणला होता. त्याचीच पुनरावृत्ती केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांच्या भाजपा प्रवेशाने झाली आहे. दहा दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राज्यातील पहिला उमेदवार केज मतदारसंघाबाबत घोषित केला होता.मात्र याच पहिल्या उमेदवाराने भाजपा प्रवेश केला. आता आष्टी मतदारसंघातही धस स्वतःला किंवा आपला मुलगा जयदत्त धस याला भाजपाची उमेदवारी मागत आहेत. धस काहीही करु शकतात याची प्रचिती आष्टी मतदारसंघातील जनतेला पूर्णपणे आहे. यापुर्वी २००७ मधे धसांनी स्व.मुंडे यांच्या ताब्यातील जिल्हा परिषद सदस्य फोडून राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करीत आपल्या मर्जीने अध्यक्ष निवडला होता. पुढे अनेक वर्ष धसांची सत्ता बीड जिल्हा परिषदेवर होती. २०१२ मधे संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील असे वाटत असतानाच धसांनी शेवटच्या मिनिटात बाजी पलटवून आपल्या बाजुचे सय्यद अब्दुल्ला यांना अध्यक्षपदी बसविले. आताही २०१७ मधे धसांनी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेला उमेदवार उभे केले आणि ते उमेदवार निवडून येताच भाजपात नेऊन घातले. परिणामी राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत बहुमताजवळ असतानाही पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपची सत्ता आणली. आणि विशेष हे की अध्यक्षपदही त्यांनी आष्टी मतदारसंघात नेले होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ज्यावेळी आष्टी मतदारसंघात आली त्यावेळी धसांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत धोंडे समर्थकांना या यात्रेपासून दूर ठेवल्याचं चित्र निर्माण केलं होतं. त्यामुळे भाजपाची तिकिट वाटपाचा निर्णय होईपर्यंत आ.भीमराव धोंडे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात पंकजाताईंना धसांची मदत
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सुरेश धसांची पंकजाताईंना मोठी मदत झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक राजकीय आरोपाला धसांचे तातडीने उत्तर असते. धस जेव्हापासून विधान परिषदेत गेले तेव्हापासून ते आणि धनंजय मुंडे यांच्यात चांगल्याच जुगलबंदी रंगल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे पंकजाताई मुंडे याही धसांना वेळोवेळी बळ देताना दिसतात. पण आता धोंडे की धस यात कुणाच्या बाजुने त्या माप टाकतात हे पहावे लागणार आहे.



















