पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.१२.२०२१
पुणे- कर्ज काढून देतो, असे सांगून कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून न देता ९० ते १०० लोकांची एकूण ६,४१,०००/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ सप्टेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत खराडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे.
शिरीष उर्फ ओम ज्ञानदेव खरात (वय-३८, भवानी रोड, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड, कॅम्प, नाशिक) असे अटक आरोपीचे नाव असून, याबाबत जितेंद्र शुक्ला (वय-२८, रा. कात्रज, आंबेगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कुबेर शक्ती मल्टीपर्पझ इंडिया निधी लिमी. या नावाने खराडी येथे प्राईड आयकॉन या ठिकाणी व खराडी बायपास येथे उत्तम प्लाझा या ठिकाणी ऑफिस सुरु केले. फिर्यादी शुक्ला व इतर ९० ते १०० लोकांना कर्ज काढून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कर्जासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नाही. तसेच फिर्यादी व इतर लोकांकडून कर्जासाठी घेतलेली रक्कम मागणी करूनही आरोपींनी परत केली नाही. फिर्यादी व इतर लोकांकडून घेतलेले एकूण ६,४१,०००/- रु. परत न करता आरोपींनी त्यांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.



















