पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०७.१९
पिंपरी- आंतराष्ट्रीय न्यायालायने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी असे निर्देश पाकिस्तानला दिले. अपना वतन संघटनेच्या महिला ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाचे स्वागत पिंपरी चिंचवड शहरामध्ये पेढे वाटून केले. पिंपरी चौक व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये पेढे वाटण्यात आले.
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून त्यांना एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावणी करून हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले असता जाधव यांच्याकडून पाकिस्तानने जबरदस्ती कबुली जबाब घेतल्याचा दावा भारताने केला होता. या खटल्याचे कामकाज दोन महिने चालले. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी नाममात्र एक रूपया मानधन घेऊन या खटल्यात जाधव व भारताची बाजू मांडली.आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. अपना वतन संघटनेने २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ मोठी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यावेळेस पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याबाबत मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा.परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना हजारो सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाने भारतीयांना अतिशय आनंद झाला असून या निर्णयाचे स्वागत अपना वतन संघटनेच्या वतीने पेढे वाटून करण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेच्या महिला शहराध्यक्षा राजश्री शिरवळकर, उपाध्यक्ष आरती कोळी, संघटक हेमलता परमार, सहसंघटक निर्मला डांगे, लक्ष्मी पांचाळ, संपर्क प्रमुख हरिशचंद्र तोडकर, लक्ष्मण पांचाळ, विशाल निर्मल, तौफिक पठाण, केशव बुडगळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



















