तेल्हारा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत; सततच्या पावसामुळे अनेक मार्ग बंद, वाहतुकीला फटका
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, संघर्ष बोदडे
दि. ३.०८.२०२६
तेल्हारा – तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्णा, गोमाई, आस व विद्रुपा नद्यांना पूर आल्याने अनेक पूल व रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे लहान-मोठे नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पुलांवरून एक ते दोन फूट पाणी वाहत आहे. परिणामी काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विशेषतः अकोला–तेल्हारा मार्ग बंद झाल्याने प्रवासी, शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
मनात्री–अडसूळ मार्गावरील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने दळणवळणावर परिणाम झाला आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक नसल्यास नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे सांगितले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत तहसीलदार महेश रामगुंडे यांनी सांगितले की, “तालुक्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.”
दरम्यान, पावसामुळे शेतातील पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.



















