सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.११.१९
माळशिरस- नातेपुते शहरात डेंगू व गोचीड ताप या आजाराची साथ आली असून नातेपुते परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत तर बऱ्याच जणांना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे तरी देखील शासनाकडून ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे.सरकारी दवाखान्यात गोरगरीब जनता उपचारासाठी जात असतात अशा लोकांना डेंग्यु तपासणीसाठी आवश्यक सीबीसी प्लेटलेट काउंटिंग मशीन तसेच हिमोग्राम तपासणीसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. खाजगी लॅबमध्ये रक्त तपासणीसाठी सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात. ज्या लोकांना मोलमजुरी करून दोन वेळचे पोट भरणे व घर संसार चालवणे अवघड आहे त्या लोकांना अशा परिस्थितीत एवढी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न पडला असून जनता या प्रकाराने खूपच त्रस्त झाली आहे.सरकारी रुग्णालयात चौकशी केली असता असे समजले की रुग्णालय व्यवस्थापनाने वारंवार मागणी करून सुद्धा यावर कसलीही उपाययोजना होत नाही तरी संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकारी नक्की या गोष्टीकडे कधी लक्ष देतील हे समजत नाहीये.परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या सर्व प्रकाराने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी संबंधितांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे.



















