पावसाळ्यात शेतीच्या बांधांवर जेसीबीने खोदकाम; संतप्त शेतकऱ्यांनी भोन – नवीन वसाडी रस्त्याचे काम रोखले
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि.२४.०७.२०१६
संग्रामपूर- तालुक्यातील भोन ते नवीन वसाडी या रस्त्याचे काम पावसाळ्यात सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्यालगत शेतीच्या बांधांवर जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसून शेतीची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर तामगाव व संग्रामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी २3 जुलै रोजी रस्त्याचे काम थांबवून तीव्र नाराजी व्यक्त केली.
सध्या पावसाळ्यामुळे डवरणी, तणनियंत्रण व इतर शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले असून शेतीकामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. पावसाळ्यात अशा प्रकारचे खोदकाम केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खोदकामामुळे काळी माती रस्त्यावर येत असल्याने वाहन घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
भोन, कवठळ, काकोडा, चोंडी, टाकळेश्वर व बोडखा या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज संग्रामपूर येथे सायकल व दुचाकीने ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर मोठी वर्दळ असतानाही संबंधित कंत्राटदाराचे मोठे हायवा टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्याच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधांवर खोदकाम करू नये, रस्त्याचे काम तात्पुरते स्थगित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षेची तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.



















