पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०१.०१.२०२०
पणे- महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. आमदार संग्राम थोपटे यांचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी बॅनर्स घेऊन पुण्यातील काँग्रेस भवनात मंगळवारी प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात प्रवेश करुन तोडफोड केली. या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या खिडकी, खुर्च्या, दरवाजे, टीव्ही, टेबल यांची तोडफोड केली. काँग्रेस कार्यकर्ते तोडफोड करत असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिसांनी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सोमवारीच त्यांचे समर्थक नाराज झाले होते. सोमवारी आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. आमदार संग्राम थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भोर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांचा पराभव केला. कुलदीप कोंडे यांचा पराभव करत संग्राम थोपटे यांनी विजयी हॅटट्रीक केली आहे.



















