चंद्रपुर(निर्भिड न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.१०.१९
चंद्रपूर- निवडणूक काळात आदर्श आचारसहिता लागू असताना वर्तमानपत्रांकडून नेहमी वस्तुनिष्ठ, प्रामाणिक आणि तटस्थ बातमीची अपेक्षा असते. परंतु या काळात काही वृत्तपत्रांनी आचारसंहितेचा भंग करत एकाच उमेदवारांचे गुणगान करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. यावर जिल्हा निवडणूक विभागाने कायदेशीर कारवाई करत दोन वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधींना नोटीस बजावली आहे. तसेच सदर पेड न्यूजचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पेड न्यूजचा माध्यमात शिरकाव झाला होता. उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत खर्चावर बंधने आणली गेली. तरीही काही उमेदवार चुपचाप पेड न्यूजच्या माध्यमातून आपला प्रचार करत असतात. बातमीच्या स्वरूपात व्यक्तिगत कामाची प्रसिद्धी होते. अशा बातम्यांसाठी पैसे दिल्या गेलेत काय याचा खुलासा मागण्यात आला आहे. अशा पद्धतीच्या बातम्या जिल्ह्यातील काही वृत्तपत्रांमधे आढळून आल्या आहे. त्याची तपासणी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत करण्यात आली. त्यामध्ये सदर बातमी पेड न्यूज असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यावर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत ही बाब जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई करत सदर वृत्तपत्राला नोटीस बजावण्याचे तसेच सदर पेड न्यूजचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावर तात्काळ अंमलबजावणी झाली असून संबंधित वृत्तपत्रांच्या जिल्हा प्रतिनिधींना नोटीस बजावलेल्या आहे. एका वृत्तपत्राने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच ज्या उमेदवाराचा पेडन्यूजच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सदर पेड न्यूजचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. सोबतच जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने सर्व वर्तमानपत्रांना ताकीद दिली आहे की, आदर्श आचारसंहिता लागू असताना किंवा अन्यवेळी देखील प्रेस कौन्सिलच्या ३० जुलै २०१० च्या अहवालातील परिच्छेद ५ नुसार ‘वृत्तपत्रांकडून एका विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाच्या प्रचाराची अपेक्षा नाही. असे असल्यास दुसरा उमेदवार किंवा पक्षाला उत्तर देण्याची जबाबदारी येते. वस्तुनिष्ठ वृत्तांकनावर भर हवा.’ कोणत्याही एकाच उमेदवाराचे गुणगान करणारे तसेच कोणत्याही पक्षाचा प्रसार व प्रचार करणारे वृत्त प्रकाशित करणे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. सर्व वर्तमानपत्राकडून वस्तुनिष्ठ व निपक्षपाती बातम्यांची अपेक्षा असून पेड न्यूज प्रकाशित करून आचारसंहितेचे उल्लंघन करू नये, अशा सूचना जारी केल्या आहे.



















