मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.०१०.१९
मुंबई- भाजपने जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षाला फसवल्याचा आरोप पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. सोमवारी ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपने मला फसवले माझ्या पक्षालाही धोका दिला आहे असे जानकर यांनी म्हटले आहे. युतीच्या जागावाटपात मित्रपक्षांना अवघ्या १४ जागा देण्यात आल्या आहेत. भाजपने या जागा आपल्या कोट्यातून दिल्याने मित्रपक्षांना भाजपाचे चिन्हावर निवडणूक लढण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे जिंतूर आणि दौंड या जागांवर भाजपने परस्पर रासपच्या राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांना ए आणि बी फॉर्म दिले होते. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते. परंतु या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे ए आणि बी फॉर्म दिले गेले. यामुळे नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी मुंबईतील पक्षकार्यालयात पक्षाची तातडीची बैठक बोलवली होती. बैठकीसाठी महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांच्यासह कार्यकारिणी सदस्य या बैठकीस उपस्थित होते. दरम्यान,रासप महायुतीमधून बाहेर पडेल अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. मित्र पक्ष असतानाही ऐन वेळेस भाजपने राहुल कुल यांना एबी फॉर्म दिला. या कृतीने महादेव जानकर दुखावले असल्याची माहिती आहे. भाजप आणि आमच्यात जागा वाटपाची बोलणी झाली होती. माझ्या पक्षाला धोका दिला आहे. शिवसेना जात्यात आहे, मी भरडला जातोय अशी खंत जानकर यांनी व्यक्त केली आहे, केवळ गंगाखेड मधून रासपचे रत्नाकर गुंठे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना भाजपा कडे उमेदवार मागे घेण्याची विनंती करू. तसेच अन्याय झाला असला तरी उपेक्षित समाजाच्या भल्यासाठी रासप महायुतीबरोबर राहाणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.



















