सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२८.०४.२०१९
पाटण, येथील मरळी गावातील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये नववी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मंतिमंद मुलीवर त्याच विद्यालयातील मुलांनी ती मतिमंद असल्याचा गैर फायदा घेवुन तिला वेगवेगळी अमीषे दाखवुन पीडितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.मरळीमधील सदर शिक्षण संस्था ही नामवंत शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेचे मरळीमधील माध्यमिक विद्यालय हे देखील नामवंत विद्यालय म्हणून ओळखले जाते.असा नावलौकिक असलेल्या माध्यमिक विद्यालयामध्ये घडलेल्या या घटनेमुळे पाटण तालुक्यासह परिसरामध्ये एकच खळबळ ऊडाली आहे.शिक्षणाचे पवित्र दान देणाऱ्या मंदिरातच मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडल्याने सदर घटनेबाबत परिसरामधून आश्चर्य व संतापाची लाट पसरली आहे.पिडीत मुलगी ही आठ महिन्याची गरोदर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सदर घटनेबाबत पाटण पोलीस स्टेशन मध्ये दि.०२.०४.२०१९ रोजी गुन्हा नोंद झाला असून असून या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. शिक्षणाचे अमृत देणाऱ्या,बालमनावर संस्कार घडविणाऱ्या शाळेतच असा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कसा घडू शकतो ? शाळेतील शिक्षक,शिक्षिका, मुख्याध्यापक,कर्मचारी,संस्थाचालक यांचे शाळेवर लक्ष नाही काय ? असे प्रकार जाणीवपूर्वक कोणी पाठीशी घालत आहे काय ? आमच्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित आहे काय ? पोलीस या प्रकरणातील दोषींना पकडून गजाआड करणार काय ? गुन्हा नोंद करून जवळ जवळ महिना उलटत आला असून पोलिसांनी अजून आरोपींना का अटक केले नाही ? कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे काय ? यासह अनेक प्रश्न पीडितेचे पालक, तालुक्यातील नागरिक व पालकांना पडले असून त्यांना त्यांची उत्तरे मिळणार काय हे येणारा काळच ठरवेल.सदर प्रकरणात पोलिसांनी योग्य ते लक्ष घालून संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून अटक करावे व पीडितेस व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा संघटना राज्यभरात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिला आहे.



















