सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.१२.१९
महाबळेश्वर- नागरिकांच्या वतीने हैद्राबाद येथील अत्याचार पीडित डॉ.प्रियंका रेड्डी या तरुणीस न्याय मिळावा म्हणून व घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाबळेश्वर शहरामध्ये कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.यास शहरातील मान्यवर व नागरिकांनी महिला,पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे व शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांनी आपले विचार मांडून निषेध व्यक्त केला तर सरकारने आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली.छ. शिवाजी चौक येथून सुरू झालेला कँडल मार्च मुख्य बाजारपेठ मार्गे डॉ.आंबेडकर स्मारक येथे दाखल झाला.तेथे दीप प्रज्वलन करून प्रियंका रेड्डी व देशातील अन्य पिडीत महिलांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या निषेध मार्च मध्ये उपनगराध्यक्ष अफजल सुतार,नगरसेवक संदीप साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष छायाताई शिंदे,सामाजिक कार्यकर्ते तौफिक पटवेकर,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रोहित ढेबे,समाज सेवक किरण शिंदे,विजय नायडू,अहमद नालबंद,संजय जेधे,विशाल हिरवे,पत्रकार बापू काळे यांचेसह मोठ्या प्रमाणात तरुण,तरुणी,नागरिक सहभागी झाले होते.या वेळी देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराविषयी उपस्थितांनी चिंता व्यक्त केली असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हा निषेध मोर्चा,कँडल मार्च विसर्जित करण्यात आला.



















