राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेतील पात्र ११ कलावंतांचा लढा तीव्र; १० ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, रवीद्र विरघट
दि. ०६.०८.२०२६
तेल्हारा- राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजना २०२४–२५ अंतर्गत पात्र ठरलेल्या ११ कलावंतांना न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती, तेल्हारा समोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला गुरुवारी (दि. ६) नऊ दिवस पूर्ण झाले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तेल्हारा यांना निवेदन सादर करून दि. १० ऑगस्ट २०२६ पासून श्री. उत्तम शालीग्राम गवई यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. संबंधित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), तहसीलदार, तेल्हारा तसेच पोलीस स्टेशन, तेल्हारा यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजनेतील पात्र ११ कलावंतांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



















