लातूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.४.१२.१९
लातूर- विलासरावांच्या नावाने ओळखले जाणारे तसेच एक भन्नाट वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख असलेले लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे अत्याधुनिक अशा लेझर प्रणालीद्वारे प्रोटेस्ट ग्रंथीची शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील पहिलंच शासकीय रुग्णालय ठरले आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल मुंढे यांनी ग्रिन लाईट लेझर (अमेरीकन मेडीकल सर्व्हिस) द्वारे पाच रुग्णावर ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने केली त्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी अभिनंदन केले आहे. याबद्दल डॉ. अनिल मुंढे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया महाराष्ट्रात दोन ते तीन खाजगी रुग्णालयात होते व तिचा खर्च ही सर्वसामान्य रुग्णाला परवडणारा नसतो. या शस्त्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत नाही तसेच कमी वेळात ही शस्त्रक्रिया पार पडते. त्यामुळे रक्ताचे दोष असणा-या रुग्णात तसेच ह्दयाचे ऑपरेशन झालेल्या रुग्णात तसेच रक्तदाब व ह्दयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी ही लेझर प्रणाली एक वरदान आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर दुस़-याच दिवशी रुग्ण् घरी जावु शकतो असेही त्यांनी सांगितले.
तरी जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी लेझर या शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहान अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर, उप अधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर, उप अधिष्ठाता डॉ. उमेश लाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल मुंडे यांनी केले आहे.



















