महाबळेश्वर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१२/२/१९
महाबलेश्वर येथे दि.0५.०२.१९ रोजी अशिक्षित महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग व अनेक बचतगट चालविणाऱ्या जेष्ठ समाजसेविका छायाताई शिंदे यांच्यावर श्रद्धा रोकडे व तिच्या कुटुंबातील उमेश रोकडे,रमेश रोकडे,अमोल रोकडे,मीरा रोकडे या समाजकंटकांनी प्रौढ साक्षरता वर्ग का चालविते म्हणत हल्ला केला. यावेळी छायाताई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने श्रद्धा रोकडे हिने हिसकावून बळजबरीने नेले आहेत.
समाजसेविका छायाताई शिंदे या गेली अनेक वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करतात.त्या यापूर्वी महाबळेश्वर नगरीच्या उपनगराध्यक्षा देखील राहिलेल्या असून प्रथम बौद्ध नगरसेवक बनण्याचा मान देखील त्यांच्याकडेच आहे. गेल्या वर्षभरापासून छायाताई नगरपालिका सोसायटी येथील समाजमंदिरामध्ये अशिक्षित महिलांना विद्येचे अमृत देण्याचे कार्य करत आहेत.त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिला या साक्षर झाल्या आहेत.दि.०५.०२.१९ रोजी रात्री ०९ वाजण्याच्या सुमारास छायाताई नेहमी प्रमाणे नगरपालिका समाजमंदिर येथे प्रौढ साक्षरता वर्गाचे क्लास घेण्यासाठी गेल्या असताना श्रद्धा रोकडे,मीरा रोकडे,रमेश रोकडे,अमोल रोकडे,उदय उर्फ ‘भिक्या’ रोकडे यांनी तु प्रौढ साक्षरता वर्ग का घेतेस ? समाजमंदिर काय तुझ्या बापाचे आहे का ? असे विचारत अश्लील शिव्या दिल्या तसेच हाताने मारहाण केली.छायाताईंच्या गळ्यातील सोन्याचे दागिने श्रद्धा रोकडे हिने हिसकावून नेले.रात्री हा प्रकार घडताच छायाताई यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन घडलेली हकीकत सांगितली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला परंतु विनंती करूनही सोन्याचे दागिने श्रद्धा हिने चोरल्याचे फिर्यादीत लिहिले नाही तसेच श्रद्धा व उमेश यांची नावे देखील गुन्ह्यातून वगळली आहेत.
श्रद्धा रोकडे हिच्यावर कारवाई करण्यासाठी दि.०९.०२.१९ रोजी छायाताई यांनी लेखी तक्रार अर्ज सहायक पोलीस निरीक्षक (API) निंबाळकर यांच्याकडे देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्यच्या वतीने निवेदन देऊन देखील मागणी करण्यात आली आहे.त्यात श्रद्धा रोकडे हिच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.छायाताई शिंदे या बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या मातोश्री आहेत.या प्रकाराने शहरात खळबळ माजली असून “शिक्षणाचे अमृत पाजणाऱ्या सावित्रीला तेव्हाही त्रास भोगावा लागला होता व आजही त्रास भोगावा लागत आहे” अशी चर्चा होत असून श्रध्दा रोकडे हिच्यावर व तिच्या साथीदारांवर केवळ ती नगरसेविका असल्यानेच पोलीस कारवाई करत नसल्याची चर्चा सुरू असून लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी होत आहे.



















