पिंपरी ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी- आनंद मोरे
घरातील कामे येत नाहीत,इंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून सारिका ऊर्फ प्रतीक्षा गणेश डांगेपाटील (वय २०) या विवाहितेने दि.१२ जुलै गुरुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती व पतिचे मेव्हने यांना वाकड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. गणेश रमेश डांगेपाटील ऊर्फ पाटील (वय २६, रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी, मूळ रा. पिंपळवाडी, येरमाळा, ता. बार्शी) असे पतीचे तर चंद्रकांत बाबासाहेब डिडवळ (वय ३८, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे पतीच्या मेव्हण्याचे नाव आहे. तसेच सासू सुरेखा रमेश डांगेपाटील (वय ४५) आणि नणंद दीपाली चंद्रकांत डिडवळ (वय ३५) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सारिकाचा भाऊ रवींद्र राजाभाऊ गलांडे (वय २१, रा. येळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सारिका व गणेश यांचा विवाह झाल्यापासून संशयित आरोपी सारिकाला घरातील काही कामे येत नाहीत, इंग्रजी बोलता येत नाही व छातीजवळ केलेल्या गाठीच्या शस्त्रक्रियेबाबत विवाहापूर्वी कल्पना न दिल्याने छळ करत होते. त्यांच्या छळाला कंटाळून शेवटी तिने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण सस्ते करत आहेत.



















