नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे
दि.५.११.१९
नाशिक- सिडको महापालिकेच्या दिरंगाईचा सामना नागरिकांसह लोक प्रतिनिधींनाही करावा लागतो. प्रभाग २९ मध्ये अनेक दिवसांपासून पथदीप बंद आहेत. एलईडी लावावेत म्हणून आधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यानी मनपाला घरचा आहेर देत मनपाच्याच विद्यत विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले. पाच तास झालेल्या या आंदोलनामुळे आधिकाऱ्यांना घाम फुटला होता. प्रभाग २९ मधील अनेक पथदीपांचे दिवे बंद असून बऱ्याच ठिकाणी पथदिप उभारण्यातच आलेले नाहीत. मुख्य रस्त्यांसह अनेक चौकांमध्ये अंधाराचे साम्राज्य असते . नगरसेवक शहाणे यांनी विद्यत विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या. अधिकारी लक्ष देत नसल्याने नगरसेवक शहाणे यांचेसह शिवाजी अहिरे, आनंद मिस्त्री, वसंत क्षत्रिय, अजय वडनेरे, राहुल वरखेडे, स्वप्नील भामरे, प्रदीप चव्हाण, राजू धात्रक, किशोर सोनवणे, स्वप्नील पांगे, भगवान बरके आदी नागरिकांनी विभागीय कार्यालयातील विद्युत विभागाच्या कार्यालयाला टाळे लावले. यावेळी विद्युत विभागाचे उपअभियंता बाबूलाल बागूल, वायरमन शिवसिंग देवरे, राजेंद्र सपकाळ, नामदेव शिवदे, राजेंद्र पगारे आदी कर्मचारी उपस्थित होते. ठोस आश्वासन मिळत नसल्याचे लक्षात येताच शहाणे यांनी अधिकारी कार्यालयात असतानाच कार्यालयाला बाहेरून टाळे लावले. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत हे टाळे उघडण्यात येणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यानंतर सुमारे चार तासांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता डी. बी. वनमाळी व उपअभियंता अनिल गायकवाड यांनी कार्यालयात येऊन नगरसेवक शहाणे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.



















