पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२१
पुणे- काही दिवसांपूर्वीच पुण्यातील फॅशन स्ट्रीटमध्ये आग लागुन ६०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली. ही घटना ताजी असताना दुपारच्या सुमारास सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळतीची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरवारे कॉलेजच्या बाजूला सेंट्रल मॉल आहे.
तेथील लोकांना डोळे, कान,नाक आणि घशामध्ये जळजळ होण्याचा त्रास होऊ लागला. तसेच मॉलच्या पार्कींगमध्ये धूर झाल्याची माहिती दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिळाली.
त्यानुसार अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेऊन पार्किंगमध्ये पाहणी केली.
या पहाणीमध्ये पार्किंगच्या एका कोपऱ्यात गॅस सदृश्य वस्तु आढळून आली. या वस्तूमधून होणाऱ्या गॅस लिकेजमुळेच नागरिकांना त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं. या वस्तूवर पाणी मारण्याआधी मॉलमधील ३०० जणांना बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात आला.
यानंतर काहीवेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
मात्र ही वस्तू नक्की कुठून आली यासंदर्भातील तपास अद्याप सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही तासांनंतर हा मॉल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आलाय.



















