पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी:
बोपखेल येथील पंचशिलनगर मधील दोन तरुणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी तसेच बोपखेल येथे औषध फवारणी करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्वाईन फ्लू व डेंगूसदृश्य आजारांमुळे यापूर्वीही दोन महिलांना जीव गमवावा लागला. परंतु तरुणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे येथील नागरिकांकडून महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने बोपखेल मध्ये थैमान घातले आहे. परंतु आरोग्य विभागाने वैद्यकीय विभागाने याला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हे आजार बोपखेल परिसरात बळावले आहेत.या भागात औषध फवारणी करून स्वाईन फ्लू व डेंगीसारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात यावी अशी येथील मागणी नागरिक करीत आहेत.



















