महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा; पिंपरी चिंचवड मुस्लिम समाजाची मागणी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.०३.०३.२६
पिंपरी-भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी अहिल्यानगर येथे मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह व निषेधार्ह विधानाबाबत त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात आज पिंपरी येथे विशेष बैठक आयोजित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चामध्ये भाषण करताना आमदार महेश लांडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह व फौजदारी गुन्ह्याचे स्वरूप असलेले विधान जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करण्यात आला.
हे विधान ‘हेट स्पीच’च्या श्रेणीत येत असल्याने पोलिसांनी स्वतःहून (सुओ मोटो) तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, ४८ तास उलटूनही अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने उद्यापासून शहरातील सर्व २५ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीस नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे यांच्यासह फजल भाई शेख, शाहाबुद्दीन शेख, हाजी युसुफ कुरेशी, रुहीनाज शकील शेख, नबील पानसरे, युनूस खतीब, अय्याज शेख, हाजी गुलाम रसूल, व्ही.एम. कबीर, जावेद शाह, सालार शेख, फिरोज तांबोळी, तोफिक मुल्ला, मोहसीन भालदार, इम्तियाज अत्तार, अब्दुल लतिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.



















