कादवानगर येथील अंगणवाडीत बालकांना डोस
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि.०२.०७.२०२६
दिंडोरी- देशभरात राबवल्या जाणार्या पल्स पोलिओ मोहिमेतंर्गत दिंडोरी शहरात बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात आली. कादवा नगर येथील अंगणवाडी केंद्र येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान बालकांना लस देण्यासाठी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे या मोहिमेला दिंडोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या मोहिमेप्रसंगी शासकीय जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन गांगुर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गांगुर्डे यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधत, पोलिओ निर्मूलनासाठी प्रत्येकाने जागरूक राहून आपल्या मुलांना डोस पाजण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक नितीन गांगुर्डे, आरोग्य सेवक अरुण चव्हाण, कल्पना पगारे यांनी पोलिओचे थेंब (दोन थेंब आयुष्याचे) पाजले. तसेच पालकांना बालकांच्या आरोग्याविषयी आणि पुढील लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी किरण तासकर, देवरे, रामदास महाले आदी उपस्थित होते.
⚫ देशातून पोलिओचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकाला ही लस मिळणे गरजेचे आहे. दिंडोरीतील प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करावी.- नितीन गांगुर्डे (अध्यक्ष, शासकीय जन आरोग्य समिती )



















